निराधारांसाठी जागर सुरू झाला.........
"रहने को घर नही सोने को बिस्तर नही, अपणा खुदा है रखवाला हेच" त्यांचे जीवन गाणे.समाजाने टाकलेल्या या माणसांच्या नशिबी 'खायला कोंडा आणि निजेला धोंडा, आलेला. प्रत्येकाच्या घरातून बाहेर पडण्याची कारणे मात्र वेगळी. विमनस्क मनस्थिती मात्र सर्वांचीच सारखी. मनाला पटेल त्या ठिकाणी दिवसभर भटकंती आणि रात्रीचा अंधार दाटू लागला की रस्त्याच्या कडेला पावले वळतात. तेच त्यांचं घर. त्यांच्या घरांना ना भिंती ना छप्पर . आडोशाची कोणतीही जागा पुरेशी. काहींची जागा परमनंट, तर काहीजण भटकंती करत जिथे मनात आले त्या ठिकाणी लवंडले.कोणी याना बेवारस म्हणतात. तर कोणी निराधार. तर कोणी वेडा ठरवून त्यांच्या जगण्याची थट्टा उडवतात. पण या माणसाच्या वर अशी वेळ का आली ? याचा विचार करायला फारसा कुणाला वेळ नाही. खरंतर ही माणसे थकली आहेत. मानसिक दृष्ट्या कोणत्यातरी निराशेच्या अंधाराने त्यांना ग्रासले आहे. टाकलेल्या माणसांचे कोल्हापुरातील रस्त्याकडेचे हे मरणासन्न आयुष्य मी पाहिलेले..........
अन असा सुरू झाला जागर.....
तेव्हा या रस्त्यावरील निराधारांसाठी आपण काही करू शकतो का ?....असा विचार प्रथम सन 1992 ला आला. आणि मग स्वेच्छेने त्यांच्या प्राथमिक गरजा-- खाणे- पिणे, वैद्यकीय मदत, पांघरण्यासाठी एखादी चादर. अशी जमेल तशी मदत करू लागलो. महिन्यातून किमान एकदा डॉक्टरांना घेऊन त्यांच्या भेटीला जाऊ लागलो. सोबत एखादा डॉक्टर घेऊन फिरती करू लागलो. रात्री अकरा ते बारा ही आमची ठरलेली वेळ. तसेच समाजाच्या डोळ्यासमोर न येणारी पण त्या निराधारांच्या सोयीची असायची. रस्त्यावरची ही माणसे आपलं संपूर्ण नाव कधीच सांगत नाहीत. त्यांना फारशी कोणाची सलगी नको . मग एखाद्या वेळेस तुम्ही मदत नाही केली तरी चालेल. खायला द्या खातील. पण भूक लागली म्हणून आक्रस्ताळी होणार नाहीत. आम्ही दिलेल्या चादरी किंवा रजई बऱ्याच वेळेला झोपलेल्या ठिकाणी सोडून जातात किंवा दुसऱ्याला देऊन टाकतात. एक अनुभव मात्र मनाला वेदना देणारा असतो तो म्हणजे फार ओळख वाढू लागली की ही माणसे जागा बदलतात आणि बऱ्याच वेळा तर शहर सोडून जातात.